गोल-गोल तरंग

ती आर्ट गॅलरी एक मस्त गोल प्रकरण होती. तिच्या मध्यावर एक गोल जिना होता, त्या चार मजल्यांना जोडणारा. प्रत्येक मजल्यावर भारी भारी मजेच्या गोष्टी ठेवल्या होत्या... उदाहरणार्थ पहिल्या मजल्यावर एक प्रवाशाची ट्रंक होती आणि त्यात निळं निळं आभाळ भरलेलं होतं. दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यात खूप वाद्यं ठेवलेली होती. बटन दाबताच ती स्वत:च वाजत होती. मग काही बोर्डांवर जुन्या जाहिराती आणि कात्रणं होती तर काही क्लिष्ट गणिती प्रमेयं गंभीर डिझाईन्स बनवत होती.
अशा या अनेक मजले-मजलेभर पसरलेल्या गोष्टी कशासाठी होत्या किंवा त्यांचा काय उपयोग होता हे कळणं अवघडच होतं. त्यामुळेच बहुतेक गॅलरी तशी रिकामीच होती आणि सगळ्या गोष्टी शांततेच्या जड वेष्टनात गुंडाळल्यासारख्या होत्या.
अचानक तरंग उठावेत तशी टक-टक-टक-टक चार छोटी टाळकी गॅलरीत आली. विस्फारलेल्या नजरांनी त्यांनी आकाशाची पेटी वाकून वाकून पाहिली तर बुद्धीबळाच्या आठ भलत्या-भलत्याच आकाराच्या पटांवर ते खूपच खूष झाले. टीवी चे संच, विचित्र चित्रं, डब्या, खेळणी असं बघत बघत मंडळी चौथ्या मजल्यावर पोचली आणि तिथून तळमजल्याच्या मध्यावर ठेवलेल्या पियानोकडे बघायला लागली. वरून डोकावणारी चार टाळकी जणू त्या शांततेच्या fluid मधे उचंबळणारे तरंगच वाटत होती.