त्याच्या प्रतिभेचे धुमारे अर्थात बेबलॉश्की लिहायला बसतो तेव्हा..
कित्येक दिवस खूप साहित्यिकांच्या खूप थोर कलाकृती वाचून झाल्यावर बेबलॉश्कीला वाटले आपणही काहीतरी लिहावे. त्याने एक नवी कोरी रेघारेघांची वही आणली आणि एका नव्या कोऱ्या काळ्या पेनाने लिहायचे ठरवले. पण आता काय लिहावे हा प्रश्न निर्माण झाला. मग डोक्यात जो पहिला विचार आला त्यावर त्याने लिहायला सुरुवात केली तर त्याला दोन ओळींतच लक्षात आलं की एका साहित्यिकाने त्यावर आठ खंड आधीच लिहून ठेवले आहेत. मग दुसऱ्या नंबरच्या विचारावरचा त्याला हायकू संग्रह आठवला. तिसऱ्या आणि चौथ्या विषयाचीही अशीच अनुक्रमे एका ब्लॉग आणि दिर्घांकामध्ये वासलात लागल्यावर बेबलॉश्कीला एकदम कोंडीत सापडल्यासारखं वाटू लागलं. त्यात त्याला वहीची पानंही उष्टी झाल्यासारखी वाटू लागली. तो मग भयंकर अस्वस्थ झाला आणि त्यानं पटकन वहीची लिहिलेली पानं फाडून टाकली.
वही spiral binding ची असल्यामुळे पुन्हा नवी कोरी दिसू लागली. त्या शुभ्र पानांकडे बघता बघताच बेबलॉश्कीच्या मनात विचार आला "या कोऱ्या पानासारखाच माझा हा प्रयत्न नवा कोरा आहे, कदाचित आधी कोणी कोणी महान लोकांनी सर्व विचारांवर लिहून ठेवलेलं असेलही, पण माझे विचार तर माझ्या आयुष्यावरचेच तर आहेत ना!! कदाचित माझं लेखन कोणाला खूप थोर वाटणारही नाही पण माझ्या आयुष्यावरचे माझे विचार तर फक्त मीच लिहू शकतो!!" बेबलॉश्कीला आता डोक्यातल्या सर्वच्या सर्व गोष्टी लिहून काढायची तीव्र निकड भासू लागली.
मग सुरुवातीच्या आखीव-रेखीव हस्ताक्षराचं अखर-वखर शब्दांत रुपांतर होईपर्यंत तो लिहितच राहिला.
