थोर साहित्यिकांचे विचार आणि मांजर
त्या दिवशी झोपेतून अर्धवट जाग येत असतानाच बेबलॉश्कीच्या मनात वाचनाची आवड निर्माण झाली. पूर्ण जाग येईपर्यंत ती बरीच तिव्रही झाली. मग आवरासावर करून तो तडक पुस्तकांच्या दुकानात गेला. साहित्याच्या विविध झऱ्या-नाल्या-समुद्रांमधे तो बराच काळ डुंबत राहिला. जवळ-जवळ दोन तासांने जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा हातात पुस्तकांची मोठी चळत आणि चेहेऱ्यावर कृतकृत्य भाव घेऊनच. मग नेहमीसारखा बाजारात इकडे-तिकडे न भटकता तो तडक घरी आला. एका थोर साहित्यिकांचं पुस्तक त्याने आल्या-आल्या वाचायला घेतलं. पुस्तक संपेपर्यंत तो जराही जागचा हलला नाही, अगदी काळ्या-हिरव्या मांजराला उनाडायचं उधाण आलं तरीही नाही. पुस्तक मिटलं तेव्हा तो विचारांच्या चक्रांमध्ये अडकून गेला. त्याला पुस्तक खूपच आवडला होतं. तो विचार करू लागला, "माझे विचार लेखकाच्या विचारांशी तंतोतंत जुळतात....आणि लेखक थोर आहेत..म्हणजे खरंतर मीही थोर आहे की काय??!!" या धक्कादायक विचाराने बेबलॉश्की एकदम भांबावून गेला! त्या वेळी, थोर साहित्यिकांचे पुस्तक बेबलॉश्कीकडे असल्यामुळे काळ्या-हिरव्या मांजराला एका कमी थोर लेखकाच्या पुस्तकावरच आपली नखं खरवडून साफ करावी लागली.
