इथलं आणि तिथलं... किंवा कुठलंही
बेबलॉश्की दुपारचा फळं खात बसला होता, त्याच्या आवडीचं सिताफळ आणि ज्याच्या विषयी त्याचं फार काही मत नव्हतं असं सफरचंद. चाळा म्हणून तो विचार करू लागला, "हे सफरचंद कुठून आलं असेल, आणि हे सिताफळ?" तो राहतो त्या जवळच्याच जिल्ह्यात मुबलक सिताफळं पिकतात हे त्याला ठाऊक होतं. दुसऱ्या देशांमधे सिताफळं मिळत असतील का? असा प्रश्न त्याला पडला आणि मिळत नसतील तर तिथल्या लोकांविषयी त्याला हळहळही वाटली. दुसऱ्याच क्षणी सफरचंद 'New Zealand' मधून आलंय याची त्याला खात्री पटली, कारण त्यावर तसं लेबलच चिकटवलेलं होतं. मग त्याला एक भन्नाट कल्पना सुचली, त्यानं सफरचंदाचं लेबल काढून अलगदपणे सिताफळावर लावलं.मग खूष होत त्यानं New Zealand चं सिताफळ मटकवायला सुरुवात केली आणि थोडसं काळ्या-हिरव्या मांजरालाही देऊ केलं. पण New Zealand च काय, कुठल्याच देशातलं सिताफळ मांजराला आवडत नसल्यामुळे बेबलॉश्कीकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष टाकून ते तिथून पसार झालं!
0 comments:
Post a Comment