ती गेली तेव्हा

त्या एका सुरेख दिवशी, काळ्या हिरव्या मांजराला खूपच कंटाळा आला होता. काय कारण होतं कोणास ठाऊक पण त्याला नेहमीसारखं काहीच वाटत नव्हतं. नेहमीसारखं म्हणजे उनाडावं, झोपावं, आळसावं या प्रकारचं काहीच त्याला वाटेना. थोडं त्राग्यानीच ते दारातून बाहेर पडलं आणि निरुद्देश चालू लागलं. त्याला पाहताच शेजारच्या जाड़्या कुत्र्यानी जोर जोरात भुंकायला सुरुवात केली, पण मांजराला आज socialization चा मूड नव्हता, त्यानी जाड्या कुत्र्याकडे दुर्लक्ष केलं. कुत्रा तरीही नेटाने भुंकत राहिला. गल्लीला चार फेऱ्या मारून झाल्या, कचराकुंडीत नाक घालून झालं, कोपऱ्यावरच्या बंगल्यात उडी मारून झाली तरीही मांजराला छान वाटेना. मग ते गुलमोहोरावरच्या एका विविक्षीत फांदीवर चढून बसलं. ती त्याची आवडती जागा होती, तिथून त्याला त्याचं घर आणि ओळखीची इतर चार दोन घरं दिसायची. आताही बेबलॉश्की कुंपणावरून पलीकडच्या घरातल्या बाईंशी बोलताना दिसत होता. मांजराला वाटलं "बेबलॉश्की किती बडबड करतो..नेहमीच...त्यातली अर्धी बडबड तर निरर्थकच असते..जेव्हा तो खाऊ देतो तेव्हाच काय तो त्याच्या बोलण्याला अर्थ असतो, एरवी नुसतेच वेगवेगळे आवाज करत बसतो..आत्ता ज्यांच्याशी बोलतोय त्या बाईही अशाच... पण त्यांची मांजर व्यवस्थीत बोलते..सगळं समजतं तिचं बोलणं..पण कालपासून तीही नसणारच आहे आता..तिला आचरटासारखं माणसं बघायला जायचं होतं म्हणे...Cat show ला..कित्ती कंटाळवाणं आहे सगळं!"
मांजराला गुलमोहोरावरच्या आवडत्या जागीही मजा वाटेना, त्यानं खाली उडी मारली आणि परत गल्लीच्या फेर्या आणि फाटकांवरच्या उड्या सुरू केल्या.

3 comments:

संवादिनी said...

छान गोष्ट आहे. आवडली!

Raj said...

मस्त! मी बेबलॉश्की आणि काळ्या-हिरव्या मांजराचा पंखा झालो आहे. :) चित्रही सही आहे. चित्रे हातानी काढली आहेत की संगणकावर?

Nivedita Barve said...

samvadini ani raj,
compliments sathi dhanyawaad!
chitra sanganakavar kadhli ahet, Flash vaparun.