दुर्दम्य आशावाद आणि निकराची लढाई
त्या दिवशी खूप जोराचा पाऊस पडत होता. अगदी ढगांच्या गडगडाटा - विजांच्या कडकडाटासह. मग दिवेही गेले आणि बेबलॉश्कीला खूपसा कंटाळा आला. अंधारात काय करू शकणार होता तो? त्याने चाळा म्हणून रुबिक्स क्युब हाताशी घेतला. त्या क्युबने आधीही ’न सुटून’ बेबलॉश्कीचे अनेक आठवडे मनोरंजन केले होते. मेणबत्तीच्या उजेडात क्युबचे नारींगी-लाल रंग एकसारखेच दिसत होते. बेबलॉश्कीने विचार केला, तसं तर तसं, जर क्युबचं कोडं सुटलं तर काय हरकत आहे? आधी नीट लक्ष देऊन तो क्युब फिरवू लागला, पण मग काहीच सुटेनासं झाल्यावर त्यानी तो आडवा-तिडवा हाताला लागेल तसा फिरवायला सुरुवात केली. थोड्यावेळानी मेणबत्तीही विझून गेली, तरी बेबलॉश्कीचा चाळा सुरुच होता. अंधारात त्याच्या क्युबचा कडकड आवाज बराच वेळ येत राहिला. नंतर रात्री कधीतरी त्याला झोप लागून गेली तेव्हा कुठे त्याचे निकराचे प्रयत्न थांबले.
सकाळी त्याला लवकरच जाग आली. आळस वगैरे देत असतानाच त्याला अचानक क्युबची आठवण झाली. त्यानी अधीरपणे इकडे-तिकडे पाहिलं. मेणबत्तीच्या गोठलेल्या तळ्याशेजारी गरीबपणे पडलेला क्युब सुटलेला नव्हताच.
कित्येक दिवस-महिने मग तो धुळीचे थर पांघरत पुस्तकांच्या कपाटात पडून राहिला.
2 comments:
chaan...timba katha avadali....kiti goshti na sutata dhuliche thar khat padun raahatat nahi? udaharanartha maza blog...lol
thanks koham...ani tuzya blog sathi shubhecha :) its good writing, keep at it!
Post a Comment