१६ दशलक्ष रंग आणि अजून थोडे

त्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना एक युनिफॉर्म मिळत असे. सकाळचे साडेआठ वाजले की सगळ्या क्युबिकल्स निळ्या रंगाच्या धुक्यात बुडून जात.
लिंडाचा कंपनीतला तो पहिलाच दिवस होता. तिची ही नोकरी ही पहिलीच होती. तिला कंपनीबद्दल आणि युनिफॉर्मबद्दल अभिमान वाटत होता. ती मोठ्या कंपनीत काम करत असल्याचा सिंबॉल होता तो युनिफॉर्म. कंपनीत शिरल्या शिरल्या आपल्यासारखेच अनेक लोक बघुन तिला छान वाटलं.
पण मग ती जेव्हा तिच्या नव्याने झालेल्या मैत्रिणीला शोधायला निघाली तेव्हा सगळीकडे निळे ठिपके बघून ती भांबावली. सगळेच लोक एकसारखेच तर दिसत होते, त्यांना पटकन वेगळी वेगळी माणसं म्हणून ओळखणं अवघडच होतं तस, जणु त्यांची "इन्डिविजुऍलिटी" च गेली होती. लिंडाला उगाचंच दिवसभर अस्वस्थ वाटत राहिलं. तिने आजु-बाजूला पहण्याचे टाळलेच मग.
जेव्हा संध्याकाळी पाचच्या ठोक्याला सगळ्यांचं काम संपलं तेव्हा लिंडाला दिसलं की सगळ्यांनी पटापट आपले निळे जॅकेट्स काढून ठेवले. सगळ्या क्युबिकल्स अचानक रंगीत झाल्या. तिनी जॅकेटची नीटशी घडी केली आणि मजेत शीळ घालत घराच्या दिशेनी चालू लागली.