मांजराचे कोळ्याविषयीचे प्रगल्भ विचारमंथन
काहीतरी घडलं आणि काळ्या-हिरव्या मांजराला जाग आली. त्याने डोळे उघडले तर त्याला एक मोठा काळा टपोरा कोळी तुरू तुरू झाडीत जाताना दिसला. तो खाऊन टाकायला हवा होता की कसं असा विचार करत असतानाच, बेबलॉश्कीच्या चुळबुळीमुळे ते भानावर आलं. काहीशा रागानं त्यानं बेबलॉश्कीकडे पाहिलं तर बेबलॉश्की खुळ्यागत आपल्या बोटांकडे बघत बसलेला दिसला. मांजर विचार करू लागलं, "बेबलॉश्कीला स्वत:च्या बोटांकडे बघून काय नविन ज्ञान मिळणार आहे? त्यानी जर माझ्या बोटांकडे पाहिलं तर त्याला मांजरांच्या पायाची ठेवण किंवा नखे किती स्वच्छ ठेवावीत असं काहीतरी समजु शकेल. किंवा त्यानी समजा त्या कोळ्याचे पाय निरखून पाहिले तर ते चविष्ट असू शकतात हे त्याला कळू शकेल किंवा खरंतर बेबलॉश्कीची बोटं खुपशी कोळ्याच्या पायांसारखीच दिसतात हे ही त्याला कदाचित लक्षात येईल..." अनेक विचार एकदमच करुन पाहिल्यामुळे मांजर थकाटले आणि त्याला अचनाक झोप दाटून आली.

