एकदा भेटलेली नामगेई

...त्या दिवशी दुपारी नामगेई आपल्या छोट्या गावातल्या छोट्या शाळेतून घरी चालली होती. पाठीवरचं मोठंसं दप्तर सांभाळत पडलेल्या चेहऱ्यानी जड पावलं टाकत. लांबवर, दोर्जी उड्या मारत चाललेला दिसत होता. तिला त्याचा एकदम रागच आला.
दोर्जी तिच्या शेजारच्या घरात रहायचा. तो नेहमीच तिच्या खोड्या काढायचा. आत्तासुद्धा पळत पुढे जाताना तो तिला जोरात टप्पल मारुन गेला होता. तिचा शाळा सुटण्याचा आनंद पार ओसरून गेला. "आपण दोर्जी शेजारी रहातो म्हणुनच तो आपल्याला मारतो, दुसऱ्या गल्लीत रहाणाऱ्या लामोला कुठे कधी तो मारतो? एकदा तर त्यानी एक मस्त गुळ्गुळीत दगड पण दिला होता तिला...जर मी दुसऱ्या गल्लीत रहायला गेले तर तो चांगलं वागेल का?" नामगेई विचारांच्या तंद्रीत चालत मुख्य रस्त्याशी पोचली.
त्या रस्त्यावरुन काही वेगळ्या देशातल्या लोकांचा घोळका रमत-गमत चालला होता. त्यातली एक बाई नामगेई जवळ आली. तिने नामगेईचा एक फोटो काढला आणि तिच्याशी थोड्या गप्पा मारुन ती आपल्या घोळक्यात परत गेली. नामगेई परत आपल्या उदास विचारात गढून गेली. तिच्याकडे बघत चललेली ती बाई आपल्या मैत्रिणीला म्हणाली, "इथली लहान मुलंही केवढी विचारी, spiritual आहेत नाही?"