सादर आहे बेबलॉश्की!

साधारण कधीही घडलेली घटना असेल. बेबलॉश्की दुपारची बारीक तीन तासांची झोप काढुन उठेल. मिटल्या डोळ्यांनीच जगाच्या भवितव्याचा विचार करेल. त्याच्या मनातून गूढ-घनगंभीर विचारांच्या किरणांची वलयं उठुन-उठुन, त्याच्या बंद पापण्यांवर धडकत राह्तील. तो त्या दिव्य भावनेचा आस्वाद घेत असतानाच त्याच्या पायालाही जोराची धडक बसेल. त्याचे डोळे प्रतिक्षिप्तपणे खाडकन्‌ उघडतील.
समोर असेल त्याचं काळं-हिरवं, पांढऱ्या तोंडाचं मांजर. बेब गोंधळात पडेल, कारण त्याचं मांजर पांढऱ्या तोंडाचं नव्हतंच. त्याचे विचार विश्वाच्या भवितव्यावरुन उठुन, मांजराच्या तोंडाच्या रंगावर येतील. थोडा विचार करताच, त्याला दुधाचं पातेलं रिकामं झालेलं असण्याची शक्यता जाणवेल.
आणि बेबलॉश्की महान तत्ववेत्ता होता होता, फक्त एका काळ्या-हिरव्या रंगाच्या मांजराचा मालकच उरेल.